An IIT Bombay study using satellite data shows rising greenhouse gas levels over Delhi and Mumbai and also identifies emission hotspots in these cities.

बॅडमिंटनमधील कौशल्य वाढवा

मुंबई
 छायाचित्र :अाशुतोष रैना

जगातील अग्रणी बॅडमिंटन खेळाडू के श्रीकांतला खेळताना बघून डोळ्याचे पारणे फिटते! आपण त्याच्यासारखे खेळावे अशी इच्छा असेल तर मूलभूत शॉटचा सराव तर उत्तम करावाच लागेल. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील 'इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम इन एज्युकेशनल टेक्नॉलजी' ह्यांनी केलेले संशोधन याकरिता उपयोगाचे ठरू शकेल. ‘फिटबिट’ सारख्या अंगावर घालता येणार्‍या उपकरणाचा वापर करून संशोधकांनी एक प्रशिक्षण प्रणाली विकसित केली आहे जी तुमच्या हाताच्या हालचाली नोंदवते आणि त्याबद्दल योग्य अभिप्राय देते.

बॅडमिंटन सारख्या गतिमान खेळात एखादा शॉट अचूक खेळायचा असेल तर त्यासाठी खूप सराव करावा लागतो. त्यासाठी उभे राहण्याची पद्धत, किती शक्ती वापरायची आणि हाताच्या हालचाली कशा करायच्या हे समजून त्याचा सराव करणे आवश्यक असते. तज्ञ खेळाडूंना बघून आपण त्यांच्यासारखे खेळायचा प्रयत्न करू शकतो, पण अर्थातच हे सोपे नसते! कारण किती शक्ती वापरायची आणि हाताची हालचाल बिनचूकपणे कशी करायची हे समजणे व समजावणे अवघड असते.

मात्र, आपल्या अाणि तज्ञांच्या खेळात नेमका फरक काय आहे हे कळले तर आपल्याला शिकायला सोपे जाईल. 'CoMBaT' (कॉम्बॅट), ह्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई इथे विकसित झालेल्या प्रशिक्षण प्रणालीमुळे नेमके हेच शक्य होते. तुमच्या परिक्षकाच्या मार्गदर्शनासोबत ही प्रणाली वापरल्यास तुमच्या सोयीच्या वेळेस आणि तुमच्या गतीने तुम्ही प्रत्येक शॉट शिकून, सराव करून सुधारू शकता.

कॉम्बॅट प्रणालीत 'थाल्मिक लॅब्स' ह्यांनी विकसित केलेला 'मायो बॅंड' नावाचा मनगटावर घालायचा एक पट्टा वापरला आहे. मायो बॅंडमध्ये विशिष्ट सेन्सर असतात, जे खेळाडूच्या हाताची सरळ रेषेतील व वक्राकार हालचाल आणि त्याच बरोबर प्रत्येक शॉटमध्ये कुठले स्नायू वापरले गेले ह्याची माहिती नोंदवताात. ही सगळी माहिती ब्लुटुथ तंत्रज्ञानाने बॅंडमधून प्रशिक्षण प्रणालीकडे पाठवली जाते. प्रशिक्षण प्रणाली ह्या माहितीचे विश्लेषण करते आणि त्याचे आलेख स्क्रीनवर दाखवते. प्रत्येक आलेखाबरोबर संदर्भासाठी तज्ञाच्या शॉटचा आलेखही ही प्रणाली स्क्रीनवर दाखवते, म्हणजे नवशिक्या खेळाडूला आपला शॉटची तुलना तज्ञाच्या शॉटशी लगेच करता येते.

खेळताना खेळाडूंना स्क्रीनकडे सतत बघणे शक्य नसते म्हणून मायो बॅंडमध्ये स्पंद निर्माण करणार्‍या मोटर असतात ज्या शॉटच्या दर्जाच्या आधारावर खेळाडूला त्वरित संकेत देतात. उदाहरणार्थ, प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर खेळाडूच्या हाताची हालचाल आणि लावलेली शक्ती यांचे मोजमाप कारून कॉम्बॅट प्रणाली दोन्हीसाठी स्कोअर काढते. खेळाडूचे दोन्ही स्कोअर एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी असतील तर शॉट 'चांगला' मानला जातो. मायो बॅंड कमी अवधीचे एक स्पंद निर्माण करते आणि प्रशिक्षण प्रणालीच्या स्क्रीनवर हालचाल आणि शक्ती ह्या दोन्हीची चिन्हे हिरव्या रंगात दिसतात. मात्र, दोन्ही पैकी एका घटकाचा स्कोअर अपेक्षित पातळीपेक्षा जास्त असेल तर शॉट 'सामान्य' मानला जातो व कमी अवधीचे तीन स्पंद निर्माण होतात आणि आलेखात घटकाचे चिन्ह लाल रंगात दिसतो. दोन्ही घटकाचे स्कोअर अपेक्षित पातळीपेक्षा जास्त असतील तर शॉट 'वाईट' मानला जातो आणि मायो बॅंड दीर्घ अवधीचे एक स्पंद निर्माण करते, व दोन्ही घटकाची चिन्हे लाल रंगात दिसतात.

प्रणालीची रचना करताना संशोधकांनी तीन नवशिक्या आणि एक तज्ञ खेळाडूला प्रत्येकी पन्नास शॉट खेळायला सांगितले. अभ्यासाचे लेखक म्हणतात, "आमच्या असे निदर्शनास आले की मायो बॅंडमधून मिळणार्‍या संकेतांमुळे खेळाडूचे खेळण्याचे तंत्र पुढच्या शॉटमध्ये सुधारते". प्रणालीबद्दल सांगताना ते म्हणाले, "शॉट योग्य प्रकारे खेळला गेला किंवा नाही ह्याचा त्वरित प्रतिसाद आलेखात दिसतो".

नवशिक्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी काही महत्त्वाचे पैलू ह्या अभ्यासात दिसून आले. उदाहरणार्थ, तज्ञ खेळाडू शॉट खेळताना हात हलवण्यापूर्वीच शक्ती लावतात. ते हे उत्स्फूर्तपणे करतात पण नवशिक्या खेळाडूंना जेव्हा हे स्क्रीनवर प्रत्यक्ष दिसते तेव्हा त्यांचा स्वतः खेळत असलेल्या शॉटबद्दलचा विश्वास वाढतो. 

खेळाडूच्या क्रियांमुळे निर्माण होणारे आलेख अधिक अचूक करून प्रशिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याची संशोधकांची योजना आहे. आगामी सुधारणांबद्दल तपशिलात बोलताना लेखक म्हणाले, "साधारणपणे नेहमी होणार्‍या चुका ओळखून त्यासाठी सुधारणा सुचवता येतील. दृश्यस्वरूपात प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी अॅनिमेशन विकसित करण्याचे कामही सुरू आहे."

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई मधील 'नेक्स्ट शैक्षणिक संशोधन प्रयोगशाळेत' वरील उपकरण विकसित केले गेले. नवनवीन तंत्रज्ञान शिक्षणासाठी कसे वापरता येईल ह्यावर संशोधन करणे हा प्रयोगशाळेचा उद्देश आहे. अंगावर घालता येणारी उपकरणे शैक्षणिक क्षेत्रात अधिक वापरता यावीत म्हणून वरील संशोधन केले गेले. लेखक म्हणाले, "क्रिकेट, गोल्फ इत्यादी सारख्या ज्या क्रीडा प्रकारात हातांची हालचाल होते आणि स्नायूंची शक्ती वापरली जाते तिथे ही साधने वापरता येऊ शकतात. फुटबॉल आणि अॅथ्लेटिक्स सारख्या ज्या खेळात पायांची हालचाल होते आणि स्नायू वापरले जातात त्या खेळांसाठी अधिक संशोधन करावे लागेल."

Marathi

Search Research Matters