An IIT Bombay study using satellite data shows rising greenhouse gas levels over Delhi and Mumbai and also identifies emission hotspots in these cities.

पुण्यातील प्राणिशास्त्रज्ञांचे कार्य : एका शतकानंतर किरकिऱ्या बेडकाची नविन जाति पुण्यात सापडली

पुणे

सरपटणाऱ्या प्राण्यांचा व बेडकांचा अभ्यास करणाऱ्यांना म्हणजेच उभयसृपशास्त्रज्ञांना २०१८ चे वर्ष प्रोत्साहित करणारे होते कारण मंडूक व पालीच्या २० नवीन जाति इथे सापडल्या. २०१९ सुरू होत असताना हेच सत्र चालू ठेवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, कोलकाता येथील शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात असलेल्या उत्तरेकडील पश्चिम घाटांत किरकिऱ्या बेडकाची (क्रिकेट फ्रॉग) एक नवीन जाति शोधली आहे. झूटॅक्सा या जर्नल मध्ये त्यांनी या शोधाबद्दल सविस्तर लिहिले आहे.

महाराष्ट्रात सापडलेल्या या बेडकाला राज्याच्या अधिकृत भाषेवरून ‘फेजेरवार्या मराठी’ किंवा ‘मराठी फेजेरवार्या बेडूक’ असे नाव दिले आहे. सध्या ‘फेजेरवार्या मराठी’ पुणे जिल्ह्यातील लोणावळा व मुळशी येथील काही ठिकाणीच दिसून आला आहे,

“(परंतु) ‘फेजेरवार्या मराठी’ बेडकाची राहण्याच्या जागेची नैसर्गिक पसंती  पश्चिम घाटाच्या उत्तरेतील भागासदृश असल्याने अहमदनगर आणि रायगड या शेजारील जिल्ह्यातही काही ठिकाणी हे बेडूक सापडू शकतील” असे या संशोधनाचे प्रमुख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. समाधान फुगे यांनी सांगितले.

संशोधकांनी एकात्मिक वर्गीकरण पद्धत वापरून नवीन शोधलेल्या बेडकांच्या डीएनए, भौगोलिक व्याप्ती, ओरडण्याचे स्वरूप आणि आकार यांची तुलना सारख्या असलेल्या, एकाच प्रजातीच्या आणि एकच अधिवास असलेल्या ‘फेजेरवार्या सेपफी’, ‘फेजेरवार्या सह्याद्रेनेसिस’ आणि ‘फेजेरवार्या ग्रॅनोसा’ या बेडकांशी केली.

‘फेजेरवार्या मराठी’ जाति असलेले बेडूक डबकी, तलाव, भातशेती आणि माळरानं असलेल्या ठिकाणी आढळतात. बहुतांश बेडकांप्रमाणे त्यांचाही प्रजननकाळ पावसाळ्यात असतो असे दिसून आले. यांचे ओरडण्याचे स्वरूप, २४ स्वरांची एक सलग माला, असे असते.

“नर पाण्याच्या डबक्यांजवळ बसून बराच वेळ एकाच स्वरात सुमारे ४० सेकंद ओरडतात. असे ओरडणे या भागात सापडणाऱ्या यासारख्याच असलेल्या फेजेरवार्या बेडकांचे वैशिष्ट्य आहे. या विशिष्ट पद्धतीच्या ओरडण्यामुळे नवीन जाति ओळखणे सोपे जाते” असे संशोधक म्हणतात. मादी डबक्याच्या किंवा तलावाच्या उथळ भागात अंडी घालते. ही अंडी खेकड्यांचे भक्ष्य झाल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

‘फेजेरवार्या मराठी’ चा शोध आणखी एका कारणासाठी वेधक आहे. तब्बल एका शतकानंतर, म्हणजे   १९१५ मध्ये ‘फेजेरवार्या सह्याद्रीनेसिस’ सापडल्यानंतर प्रथमच, पुण्यात किरकिऱ्या बेडकाची नवीन जाति सापडली आहे. उभयसृपशास्त्रातील शास्त्रज्ञांची वाढती रुची लक्षात घेता नक्कीच येत्या काळात अजूनही काही शोध लागू शकतील!

Marathi

Search Research Matters