An IIT Bombay study using satellite data shows rising greenhouse gas levels over Delhi and Mumbai and also identifies emission hotspots in these cities.

बहुपयोगी डाळिंब!

मुंबई
 छायाचित्र : समय भावसार, द्वारे अनस्प्लॅश

आरोग्यदायी व चविष्ट डाळिंबाचा रस प्यायला सर्वांनाच आवडतो. दातांखाली बिया आल्या तर कडवट लागत असल्यामुळे असेल कदाचित, पण सगळ्यांनाच डाळिंबाचे दाणे खायला आवडतात असे नाही. पण रस काढून उरलेल्या चोथ्यापासून अतिशय आरोग्यदायी तेल काढता येते हे माहित आहे? भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापक अमित अरोरा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एका अभ्यासाद्वारे डाळिंबाच्या दाण्यापासून तेल, उच्च दर्जाची प्रथिने आणि तंतु काढण्याची किफायतशीर पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे आता डाळिंबाचा कुठलाही भाग टाकाऊ होत नाही.

जगभरात डाळिंबांचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. २०१६ साली डाळिंबाचे उत्पादन २३ लक्ष टन होते. डाळिंबाचा रस अधिकाधिक लोकप्रिय होत असल्यामुळे रस काढताना निर्माण होणार्‍या टाकाऊ पदार्थांच्या मात्रेत पण खूप वाढ झाली आहे. डाळिंबाच्या एकूण वजनाच्या १०% असलेल्या ह्या पदार्थांमधून कर्करोग व मधुमेह प्रतिबंधक आणि अॅंटी-ऑक्सिडेंट तेल काढता येते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि तंतु सुद्धा मिळवता येतात.

आरोग्यदायी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 'चिया' आणि जवस बियांची तुलना डाळिंबाच्या दाण्यांशी करताना प्राध्यापक अरोरा म्हणाले, "डाळिंबाच्या बियांतील तेल आणि प्रथिनांचा दर्जा जवसातील तेलासारखाच असतो. या बियांचे गुणधर्म 'चिया' बियांच्या गुणधर्मांशी साधर्म्य असणारे असतात व त्या जवस व चिया बियांप्रमाणेच परिणामकारक असतात."

पूर्वीही डाळिंबाच्या दाण्यातून तेल काढण्याचा प्रयत्न झाला, पण त्या पद्धतीत कमी प्रमाणात तेल काढता येत असे आणि उरलेले पदार्थ टाकाऊ समजून फेकून देण्यात येत. सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या कोल्ड-प्रेस पद्धतीत हायड्रॉलिक प्रेस वापरून तेल काढले जाते, पण फक्त ४०-५०% तेल निघते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. दुसर्‍या लोकप्रिय पद्धतीत हेक्सेन सारखे कार्बनी रसायन वापरुन तेल काढले जाते, पण त्यामुळे प्रदूषण होऊन आरोग्याला धोका होऊ शकतो म्हणून रसायने हाताळताना आणि त्यांची विल्हेवाट लावताना विशेष काळजी घ्यावी लागते. परिणामत: यासाठी लागणार्‍या उपकरणांची निर्मिती आणि त्यांची देखरेख ह्याचा खर्च वाढतो. इतरही पद्धती आहेत पण त्यातील उच्च तापमान आणि यांत्रिकी दाबामुळे तेलाचा दर्जा खालावतो आणि प्रथिने पण विघटित होतात ज्यामुळे तेलाचे पोषक आणि आर्थिक मूल्य कमी होते. अल्ट्रासाऊंड आणि मायक्रोव्हेव्ह वापरणार्‍या इतर प्रगत पद्धती उपलब्ध असून त्या ९५-९९% तेल काढू शकतात पण त्यांच्या किंमती परवडणार्‍या नाहीत.

वरील समस्यांचे समाधान काढण्याचा प्रयत्न प्राध्यापक अमित आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ह्या संशोधनात केला. विशेष म्हणजे तेल काढण्याची प्रस्तावित पद्धतीत एकच भांडं वापरण्याची गरज पडते, त्यामुळे ही पद्धत पर्यावरणासाठी अनुकूल तर आहेच पण त्याच बरोबर उच्च दर्जाचे पोषक तेल काढण्याची क्षमता पण त्यात आहे. संशोधक म्हणतात की ही पद्धत खूप सोपी आहे आणि थोड्या प्रमाणात डाळिंबाचे दाणे उपलब्ध असले तरीही तेल काढण्यास वापरता येते.

प्रस्तावित पद्धतीत डाळिंबाचे दाणे वाळवून त्याची पूड केली जाते व ही पूड सोडियम फॉस्फेटमध्ये मिसळली जाते. १० मिनिटासाठी ह्या मिश्रणाचे तापमान ४५० सेल्सियस ठेवले जाते. त्यात प्रोटीझ नावाचे द्रव टाकले जाते ज्यामुळे दाण्यावरील आवरण विघटित होऊन दाण्यातील तेल मुक्त होते. हे संपूर्ण मिश्रण ४ ते १६ तासासाठी सतत हलवत ठेवून, त्यानंतर २० मिनिटासाठी अपकेंद्रित केले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की शुद्ध तेल, प्रथिने आणि तंतु ह्यांचे वेगवेगळे थर निर्माण होतात.

संशोधकांनी प्रोटीझच्या विविध संहत तीव्रता वापरुन तेल काढण्याचे प्रयोग केले आणि चौदा तासात संपूर्ण तेल, प्रथिने आणि तंतु काढता येतील अशी प्रोटीझची योग्य संहत तीव्रता शोधून काढली. त्यांना ९८% तेल आणि ९३% प्रथिने काढण्यात यश मिळाले. इतर पद्धतींच्या तुलनेत ह्या पद्धतीत मिळणार्‍या उत्पादनांचा दर्जा पण अधिक चांगला होता.

ह्या अभ्यासामुळे वैद्यकीय आणि सौन्दर्य प्रसाधन उद्योगात डाळिंबाच्या तेलाचे नवनवीन उपयोग शोधले जातील असा विश्वास संशोधकांना वाटतो. वरील संशोधन छोट्या प्रमाणावर केले गेले. हीच पद्धत मोठ्या प्रमाणात औद्योगिक स्तरावर वापरता येईल किंवा नाही ह्याचा अभ्यास अजून करायचा आहे. भविष्यातील संशोधनाच्या योजनेबद्दल बोलताना प्राध्यापक अरोरा म्हणाले, "डाळिंबाच्या तेलाचे कुठलेही दुष्परिणाम अजून तरी आम्हाला दिसलेले नाहीत. मात्र दीर्घकाळ साठवल्यास तेलाला जुनकट वास येतो. म्हणून हे तेल किती काळ साठवता येते आणि त्याचा अन्नपदार्थात वापर कसा करता येईल ह्याचा अभ्यास आम्ही यापुढे करणार आहोत."

Marathi

Search Research Matters